chief luau discount coupon garnet hill backpack coupon peppermill reno spa coupons amsterdam liquor coupons discounts

अन्नपूर्णा

आपल्याकडे लग्न झाल्यावर मुलीला सासरी पाठवताना अन्नपूर्णेची मूर्ती देतात. हातात मोठी पळी घेतलेली अन्नपूर्णा. हेतू किंवा प्रार्थना ही की हे अन्नपूर्णे माझ्यावर प्रसन्न हो. मी जो स्वयंपाक करते, त्यास रुची येऊ दे, त्यात सात्विकता येऊ दे. ते खाऊन सर्व तृप्त होऊ देत. माझ्या मनात मातृभाव जागा होवो. आसपास कोणीही उपाशी राहणार नाही, याची मी काळजी घेवो. लग्न झालं आणि घरच्या देव्हाऱ्यांत अजून एक अन्नपूर्णा आली. अन्नपूर्णा म्हणजे पार्वती. संपूर्ण विश्वाला अन्न पुरविण्याचे कार्य ती करते. म्हणून तिला अन्नपूर्णा म्हणतात. अन्नपूर्णा देव्हाऱ्यांत ठेवताना बाबांनी बजावलं होतं रोज पूजा करणार असशील तरंच पूजेत ठेव अन्यथा नको. त्यावेळी त्यांना दिलेला शब्द आज वीस वर्ष पाळला आहे. रोज इतर देवांच्या मुर्ती बरोबर अन्नपूर्णेचा अभिषेक आणि मग गंध लेपन न चुकता होतंय. अर्थात कुठं बाहेरगावी असलो तर मात्र देवपूजा ही पत्नीची जवाबदारी होते. चांदीची, हातात पळी असलेली पद्मासनात बसलेली अन्नपूर्णा. या अन्नपूर्णेनी घराला आणि मूर्तीने देव्हाऱ्याला पूर्णत्व दिलं. 

याच अन्नपूर्णेचं भव्य रूप 2019 च्या मे महिन्यांत पाहिलं. गंडकी नदीच्या काठा काठानं भरपूर पायऱ्या असणारा माउंट अन्नपूर्णा बेसकॅम्प चा ट्रेक केला तेंव्हा. अन्नपूर्णा हा नेपाळ मधील खूप प्रसिद्ध ट्रेक. 

असे फार कमी ट्रेक आहेत की त्या परिसराच्या आपण कायम प्रेमात असता अन्नपूर्णा संरक्षित भागातून जाणारा ट्रेक त्यापैकी एक. हा परिसर जैव विविधतेने इतका नटलेला आहे, की भर दुपार पर्यंत विविध पक्ष्यांचे आवाज सतत येत असतात, घनदाट जंगलातून जाणारा हा अत्यंत मनमोहक ट्रेक. प्रत्येक पायरी गणिक हा ट्रेक अन्नपूर्णा शिखर समूहाच्या जवळ नेत असतो. मच्छपुच्छ शिखर आणि दक्षिण अन्नपूर्णा शिखर सतत आपलं मार्गदर्शन करत असतात. पाच दिवसांच्या ट्रेक नंतर अन्नपूर्णा बेसकॅम्पच्या वाटेवर होतो. अर्थात हा ट्रेकर्सचा बेसकॅम्प अन्नपुर्णा मेन या शिखराचा बेसकॅम्प खूप आत दुर्गम जागी वसला आहे तिथं ट्रेक करत जाणं जवळ जवळ अशक्य आहे. त्यामुळे अन्नपूर्णा शिखर समूहातील दक्षिण शिखराच्या पायथ्याशी बेसकॅम्पचा ट्रेक संपतो. शेवटचा टप्पा पूर्ण बर्फात. एकीकडं ऊन लागत होत आणि गार वारं भणाणत होतं. समोर खूप लांब बेस कॅम्पच्या टी हाऊस दिसत होतं. हातातलं घड्याळ ४२०० मीटर ओलांडले आहेत हे दाखवत होते. समोर प्रार्थना पताका लावलेल्या बोर्डवरची अक्षरं स्पष्ट वाचता येऊ लागली, NAMSTE ANNPURNA BASE CAMP WARMLY WELCOME INTERNAL & EXTERNAL VISITORS. समोर अन्नपूर्णा शिखर समूहातील दक्षिण शिखर होतं. अन्नपूर्णेला दंडवत घातला, या उत्तुंग पर्वतांनी आम्हाला त्यांच्या अंगावर चढू दिल. एक अस्पष्टसा हुंकार आम्हाला उलथवून टाकायला पुरेसा होता. वारं आता भन्नाट सुटलं होत. पाय निघत नव्हता. जड पावलाने निघालो, सारखं मागे वळून पाहत पुढं चालू लागलो. गारा सुरु झाल्या एक दोन असं करत गारांचा पाऊस सुरु झाला. मागे वळून पाहता पाहता एका क्षणी मनाच्या कॅनवास वर आपलं अस्तित्व कोरून अन्नपूर्णेचं दक्षिण शिखर आणि बेसकॅम्प बर्फाच्या वर्षांवात आणि धुक्यांत हरवला. 

आज अन्नपूर्णेची खूप आठवण आली. कारण पर्वतांतल्या माझ्या मुशाफिरीचे फ्रेंड -गाईड आणि फिलॉसफर असेलेले उमेश मामा (उमेश झिरपे) तीन पर्वत वेड्या मित्रांच्या, भूषण हर्षे, डॉक्टर सुमित मांदळे  आणि जितेंद्र गवारे बरोबर अन्नपूर्णा मुख्य शिखर चढाई साठी मुख्य बेसकॅम्पला पोहोचत आहेत. आता या पुढं त्यांच्या खडतर दिनक्रमाला सुरुवात होणार. आणि एन्जॉय द डिसकंफर्ट म्हणत ते सारे ते सहन करणार एका ध्येया साठी. अन्नपूर्णेच्या सावलीत राहून तिची घर्म बिंदूंनी पूजा बांधणार, तिचे सुखरूप चढाईसाठी आशीर्वाद घेणार. शारीरिक आणि मानसिक कस पाहणारी रोटेशन करणार. आपल्या जिवलगांपासून दूर राहून आपल्या दैवताची उपासना करणार, एक प्रकारचं तपंच आहे ते. आणि चढाई साठी अनुकूल हवामान मिळालं की एका मोठ्या साहसाला सुरुवात करणार. 

रोज पूजेतली अन्नपूर्णा आता वेगळी दिसते. रोजचा नमस्कार आता खूप जास्त वेळा होतो. मनोमन या पर्वतवेड्यांच्या साहसाला आशीर्वाद मागतो. आदी शंकराचार्यांचे अन्नपूर्णास्तोत्र हे अतिशय सुंदर, अर्थपूर्ण आहेभुकेल्याला अन्न देण्याचा भाव माझ्या मनी जागो.’. इथं भुकेले आहेत हे पर्वत मित्र, त्या शिखराच्या स्पर्शा साठी. आदी शंकराचार्य आपल्या स्तोत्रात म्हणतात, हे अन्नपूर्णे, तू व्यापक आहेस. तू सर्वजनांची स्वामिनी आहेस. तू नेहमीच कल्याण करणारी आहेस. तू शक्ती देणारी आहेस, आरोग्य देणारी आहेस…

अन्नपूर्णे सदापूर्णे शर प्राणवल्लभे।ज्ञानवैराग्यसिद्ध्यर्थ भिक्षां देहि च पार्वति॥

माता च पार्वती देवी पिता देवो महेश्वर:।बान्धवा: शिवभक्ताश्च स्वदेशो भुवनत्रयम॥

आई अन्नपूर्णे, तू सदा पूर्ण आहेस. शंकराची तू प्राणवल्लभा प्राणप्रिया आहेस. मला ज्ञान वैराग्य प्राप्त होण्यासाठी भिक्षा वाढ.हे देवी पार्वती, तू माझी आई आहेस. महादेव माझा पिता आहे. सारे शिवभक्त माझे बांधव आहेत. त्रिभुवन हा माझा स्वदेश आहे. माझ्या मित्रांना सुखरूप ठेव आणि त्यांचा ध्यास पूर्णत्वाला ने….

अजून काय …. वाट पाहतोय 

– निलेश देशपांडे

Nilesh Deshpande